भारतीय संघाचा युवा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित


नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाली आहे. सुंदरचा समावेश दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिका संघात असून सुंदरला या मालिकेच्या काही दिवस आधीच कोरोनाची लागण झाल्यामुळे या मालिकेत तो खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. एका रिपोर्टनुसार सुंदरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय सामन्यांसाठी रवाना होणार नाही. दरम्यान बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरु होणार आहेत.

एकदिवसीय संघातील इतर खेळाडूंसोबत 22 वर्षीय सुंदर बुधवारी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार सुंदरला कोरोनाची बाधा काही दिवसांपूर्वी झाली असून तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात होता. पण आता तो बुधवारी संघासोबत आफ्रिकेला रवाना होणार नाही.