आता या वर्षीपासून विवोऐवजी आयपीएलचे प्रायोजक असतील टाटा


नवी दिल्ली – टाटा कंपनीचे नाव आयपीएलचे अधिकृत प्रायोजक म्हणजेच मेन स्पॉन्सर म्हणून इंडियन प्रिमियर लीगच्या प्रशासकीय समितीने मंगळवारी निश्चित केल्यामुळेच चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी असणाऱ्या विवोऐवजी या वर्षीपासून टाटा हे आयपीएलचे प्रायोजक असतील. पण दोन वर्षांचा विवोचा करार शिल्लक असताना अचानक टाटा कंपनीला टायटल स्पॉन्सर का बनवण्यात आले यासंदर्भातील पडद्यामागील घडामोडी समोर आल्या आहेत.

सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या माहितीनुसार टाटांना आयपीएलच्या समितीने मुख्य प्रायोजक म्हणून निवडण्यामागे विवोने घेतलेला एक निर्णय कारणीभूत ठरला. वर्षाला ४४० कोटी रुपये खर्च करुन विवोने २०१८ मध्ये टायटल स्पॉनर्सचे हक्क २०२४ पर्यंत विकत घेतले होते. पण अचानकपणे कंपनीने माघार घेतली आहे. टाटांकडे आम्ही मुख्य प्रायोजक म्हणून पाहत आहोत. विवोला त्यांचा करार रद्द करायचा आहे. या कराराचे दोन वर्ष अद्यापही बाकी असल्यामुळेच या दोन वर्षांच्या कालावधीसाठी टाटा हेच मुख्य प्रायोजक असतील, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

दोन वर्षांनी नव्याने प्रायोजक शोधण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. पण तोपर्यंत टाटा हेच आयपीएलचे मुख्य प्रायोजक असतील, असे आयपीएल समितीने म्हटले. लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक असतानाच कंपनीने करारामधून माघार घेण्याचे ठरवल्यामुळे या लीगचे नाव आता ‘टाटा आयपीएल’ असेल. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला होता. त्यावेळी हे अधिकार ड्रीम इलेव्हनला हस्तांतरित केले गेले. पण आता टाटांना आयपीएलच्या समितीने प्राधान्य देत त्यांच्या नावाची मुख्य प्रायोजक म्हणून घोषणा केली आहे.