योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याने पक्षाला रामराम ठोकत केला सपामध्ये प्रवेश!


लखनऊ – उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या तारखा दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. उत्तर प्रदेशात ७ टप्प्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीमध्ये मतदान होणार आहे. भाजपकडून त्यासाठी जोरदार प्रचारमोहीम सुरू करण्यात आलेली आहे. पक्षाकडून राज्यात पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या घोषणा करण्यात आल्या असतानाच ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात असलेले ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. यासंदर्भातील माहिती ट्विटरवर खुद्द सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली आहे.

स्वामी प्रसाद मौर्य हे मुळात २०१६मध्ये बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये आले होते. पण आता त्यांनी भाजपला रामराम करत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कन्या संघमित्रा मौर्य या अजूनही भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्याविषयी अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. सामाजिक न्याय आणि समता-समानतेचा लढा देणारे स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे सपामध्ये स्वागत आहे. सामाजिक न्याय का इन्कलाब होगा, बाईस में बदलाव होगा, असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.


दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडण्याचे कारण पक्षात काम करताना होत असलेल्या त्रासामध्ये असल्याचे सांगितले आहे. मी यांची विचारसरणी गेली पाच वर्ष पाहिली आहे. आंबेडकर विचारसरणीचा मी आहे. आंबेडकर विचारसरणीच्या एका व्यक्तीला भाजपमध्ये ५ वर्ष काम करावे लागताना, जे सहन करावं लागले, त्या माझ्या वेदना असल्याचे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तीन आमदार नाही, अजून चर्चा होऊ द्या, डझनभर आमदार राजीनामा देतील. तुम्ही पाहात राहा. पुढचे वार आणि धार पाहात राहा. एक-दोन दिवसांमध्ये त्याविषयी मी घोषणा करेन, असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले आहे.