शून्याची नोट पहिलीत का कधी?

प्रत्येक देशाचे एक चलन असते आणि त्यात नाणी, नोटा समाविष्ट असतात. कागदी नोटा आजही अनेक देशात वापरात आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांची जागा प्लास्टिक नोटा घेऊ लागल्या आहेत. भारतात १ रुपया ते २ हजार रुपये मूल्यांच्या नोटा चलनात आहेत. पण कुणी कधी शून्य रुपयाची नोट पहिली नसेल. अर्थात शून्य मूल्याच्या नोटेची गरज काय असाही अनेकांना प्रश्न पडेल. पण आपल्या देशातच शून्य रुपये किमतीची नोट छापली गेली होती आणि या मागचे कारण वेगळे होते.

भारतात भ्रष्टाचाराची मुळे खोलवर गेली आहेत याची सगळ्यांना कल्पना आहे. बारीकसारीक कामापासून अगदी मोठमोठी कंत्राटे मिळविण्यापर्यंत सर्वत्र लाच दिली, घेतली जाते. असल्या लाचखोराना धडा शिकविण्यासाठी शून्य मूल्याची नोट छापली गेली होती. अर्थात ही नोट रिझर्व्ह बँकेने नाही तर २००७ मध्ये तामिळनाडू मधील एका स्वयंसेवी संस्थेने छापली होती. या संस्थेचे नाव होते ‘फिफ्थ पिलर.’

या संस्थेने एक दोन नाही तर शून्य रुपयांच्या तब्बल पाच लाख नोटा छापल्या होत्या. हिंदी, तेलगु, तमिळ, मल्याळी, कन्नड भाषेतील या नोटा बस स्टँड, रेल्वे, विमानतळ, बाजारात वाटल्या गेल्या. जर कुणी लाच मागितली तर या नोटा द्या अशी जागृती त्यातून केली गेली होती. या नोटेवर संस्थेचे नाव होते आणि नोटेवर प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचाराचा खात्मा करा असा संदेश आणि आपल्या अधिकृत नोटांवर असणारा म. गांधी यांचा फोटो सुद्धा होता. मागच्या बाजूला अधिकाऱ्यांचे नंबर, लाच देणार नाही, लाच खाणार नाही अशी शपथ होती. दीर्घकाळ लोकांकडे या नोटा होत्या असे सांगितले जाते.