पहिल्याच दिवशी १० लाख लोकांना कोविड प्रीकॉशनरी डोस

करोना संक्रमणाने देशात पुन्हा वेग घेतला असतानाच १० जानेवारीपासून फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षापुढील अन्य गंभीर व्याधी असलेल्यांना कोविड १९ लसीचा प्रीकॉशनरी डोस देण्यास सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी देशात १० लाखाहून अधिक जणांना हा डोस दिला गेला आहे. कोविन अॅपच्या आकडेवारी नुसार सोमवारी १०,५१,४५६ जणांना प्रीकॉशनरी डोस दिला गेला. त्यात फ्रंट लाईन व आरोग्य कर्मचारी १,७९,३३९ व ३,१५,००० ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे स्वास्थ सेवेतील १.०५ कोटी कर्मचारी, फ्रंट लाईन १.९ कोटी तर ६० वर्षावरील व अन्य आजार असलेल्या २.७५ लाख कोटी लोकांना हा तिसरा डोस दिला जाणार आहे. १७ दिवसांपूर्वी प्रीकॉशनरी डोस देण्यासंदर्भातील घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

कोविन पोर्टलचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा  माहिती देताना म्हणाले, कोविन प्रणाली मध्ये काहीही अडचण आली नाही. कोणताही गोंधळ झाला नाही. आपली प्रणाली मजबूत आहे आणि अपेक्षित भार सहन करू शकेल याप्रमाणे डिझाईन केली गेली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रीकॉशनरी डोस दिले गेल्याचे त्यांनी सांगितले. दुसरा डोस घेऊन ९ महिने झालेल्या वरिष्ठ नागरिकांना प्रीकॉशनरी डोस साठी संदेश पाठविले गेले असल्याचे सांगून ते म्हणाले या साठी अतिरिक्त स्टाफ तैनात केला गेला आहे.