अमेरिका, ब्रिटनचा ‘कोविड, न्यू नॉर्मल प्लान ‘
करोना लढाई साठी अमेरिका आणि ब्रिटनच्या सरकार आणि वैज्ञानिकांनी न्यू नॉर्मल प्लान तयार केला आहे. या दोन्ही देशात करोनाने थैमान घातले आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार गेली दोन वर्षे या विषाणूने जो कहर माजविला आहे तो पाहता हा विषाणू नामशेष करण्याचा विचार करण्यात अर्थ नाही हे स्पष्ट झाले आहे. आता या विषाणू सह जगण्याची नवी रणनीती आखणे भाग आहे आणि त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या तीन सल्लागार वैज्ञानिकांनी हा रिपोर्ट तयार केला आहे तर ब्रिटनच्या बोरिस सरकारातील अर्थमंत्री ऋषी सुनक आणि शिक्षण मंत्री नदीम जहावी यांनी त्यांचा अहवाल सादर केला आहे. या रिपोर्ट नुसार देशात या पुढे लॉकडाऊन लावला जाणार नाही तर लसीकरण आणि टेस्टिंग वाढविण्यावर अधिक भर राहणार आहे. ब्रिटन अमेरिका दोन्ही देशांनी शाळा कॉलेज बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ऐवजी आरोग्यासाठी अधिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
दोन्ही देशात ओमिक्रोन मुळे केसेसचे आकडे ज्या प्रमाणात वेगाने वाढत होते तो वेग आता कमी झाला आहे. अमेरिकेत आठवड्यात ७ लाख नव्या केसेस आल्या ते प्रमाण रविवारी ३ लाखावर आल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनमध्ये ४ जानेवारीला एका दिवसात २.८ लाख नव्या केसेस होत्या त्या आता कमी होऊन १.४१ लाखावर आल्या आहेत.
अमेरिकेने संसर्ग झाल्यास विलगीकरणाचा काळ १० दिवसांवरून पाच वर आणला आहे. ५.५० कोटी टेस्टिंग कीटचे मोफत वाटप केले जात असून नेसल, सिंगल डोस आणि करोना पिल्स चा वापर वाढविला जात आहे. ब्रिटनने चौथा डोस न देण्याचा निर्णय घेतला असून दर चौरस किमी. परिसरात टेस्टिंग केंद्र असणे बंधनकारक केले आहे. संक्रमितांवर घरीच उपचार करण्यावर भर दिला आहे आणि वर्क फ्रॉम होमचे बंधन ठेवलेले नाही. विलगीकरणांचा कालावधी सात दिवसांवरून ५ दिवसांवर आणला आहे.