अतिशय साधी राहणी असलेल्या लालबहादूर शास्त्रीच्या आठवणी

जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर भारताचे दुसरे पंतप्रधान कोण असतील याची कल्पना नसताना अचानक या पदावर आलेले लाल बहादूर शास्त्री त्यांच्या निधनानंतर सुद्धा आठवणीचा खोल ठसा जनमानसावर ठेऊन गेले आहेत. १९६६ मध्ये याच दिवशी म्हणजे ११ जानेवारीला शास्त्रीजीना ताश्कंद येथे अचानक मृत्यू आला आणि या मृत्यूचे गूढ आजही उलगडलेले नाही.

अतिशय साधी राहणी आणि अतिप्रामाणिक अशी शास्त्री यांची प्रतिमा होती. अनेक वेळा ते विनम्र पंतप्रधान आहेत हे त्यांच्या वर्तणुकीतून ठळकपणे पुढे आले होते. त्यांच्या साधेपणाच्या आणि सच्चेपणाच्या अनेक आठवणी आजही सांगितल्या जातात. त्यातील काही आठवणी अश्या,

शास्त्री केंद्रात गृहमंत्री असताना कोलकाता येथे गेले होते. सायंकाळी त्यांची दिल्ली साठी फ्लाईट होती पण रस्त्यावर इतकी प्रचंड वाहतूक कोंडी होती कि विमानतळावर वेळेत पोहोचणे शक्य नव्हते. तेव्हा तेथील पोलिसांनी सायरनवाली कार आणण्याचा विचार केला तेव्हा शास्त्रींनी त्यांना रोखले. ते म्हणाले सायरन वाजवत कार गेली तर लोकांना उगीचच कुणी खास व्यक्ती चालली आहे असे वाटेल. मी कुणी खास नाही.

दुसरा एक प्रसंग म्हणजे एका राज्याचा दौरा पंतप्रधान शास्त्री यांना करायचा होता पण काही महत्वाच्या कारणाने तो रद्द करावा लागला. तेव्हा त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही फर्स्ट क्लास व्यवस्था केली आहे तेव्हा दौरा रद्द करू नका अशी विनंती केली तेव्हा शास्त्री म्हणाले, मी थर्ड क्लास आहे,मला फर्स्ट क्लास व्यवस्था कशाला? १९६५ च्या पाक युद्धात खाद्य संकट निर्माण झाले आणि अमेरिकेने सुद्धा धान्य निर्यातीवर बंदी घातली तेव्हा लालबहादूर शास्त्री यांनी स्वतःच्या कुटुंबातील लोकांना फक्त एक वेळ जेवण करण्यास सांगितले आणि घरात हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ऑल इंडिया रेडीओ वरून देशातील नागरिकांना आठवड्यातून किमान एक दिवस उपवास देशातील अन्य भुकेल्या नागरिकांसाठी करा असा आग्रह केला होता. त्याला प्रतिसाद देताना युध्द संपल्यावर सुद्धा अनेक नागरिक आठवड्यातून एक दिवस उपवास करत असत.

लालबहादूर पंतप्रधान असताना त्यांच्या मुलाने कार्यालयाची गाडी स्वतः बाहेर जाण्यासाठी वापरली तेव्हा शास्त्री यांनी त्यासाठी झालेला खर्च सरकारी कार्यालयात जमा केला होता. १९६६ साली त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या नावावर घर, जमीन काहीही नव्हते. मात्र एक कर्ज होते जे त्यांनी त्यांची पहिली फियाट कार घेण्यासाठी पंजाब बँकेकडून घेतले होते. या कर्जाचे हप्ते लाल बहादूर यांच्या पत्नी ललिता यांनी फॅमिली पेन्शन मधून फेडले होते. शास्त्रीजींचा जय जवान जय किसान हा नारा आजही लोकप्रिय आहे.