केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची देशभरातील कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना द्यावा लागणारा टोल माफ


नवी दिल्ली : सर्वसामान्य वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने देशभरातील कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना चारचाकी वाहनांना द्यावी लागणारी फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आगामी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

एकूण 62 कॅन्टोन्मेंट देशात वेगवेगळ्या भागात असून त्यातील बहुतांश कॅन्टोन्मेंट हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये आहेत. या कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या वाहनांकडून वसूल केला जाणारा टोल हा अनेकदा वादाचा विषय बनतो.

पुण्यात पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट अशी तीन कॅन्टोन्मेंट असून देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर प्रवास करताना द्यावा लागणारा टोल आजपासून द्यावा लागणार नाही. पण पुणे कॅन्टोन्मेंट रोड टॅक्सच्या नावाखाली वाहन चालकांकडून पैसै गोळा करत असल्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंटमधून प्रवास करणाऱ्या वाहनांना तूर्तास तरी या टोलमधून सूट मिळणार नाही.