शरद पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन; सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील


मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही महिन्यांपासून संप सुरू आहे. राज्यभरातील प्रवासी या संपामुळे प्रभावित झाले आहेत. जी स्थिती संपामुळे प्रवाशांची झाली, त्याचे वर्णन न केलेले बरे असे पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले. त्यातच कोरोनाचा ओमिक्रॉन नावाचा कोरोनाचा नवीन अवतार आल्यामुळे देशासह राज्यावर संकट आले आहे. राज्यातील अर्थकारणावर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत असल्यामुळे राज्यातील राज्य सरकारला त्याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागत असल्याचे पवार म्हणाले.

कृती समितीच्या सदस्यांचे काही प्रश्न आहेत, त्यातील काही प्रश्न कृती समितीने सरकारच्या नजरेत आणून दिले आहेत. सरकारचे त्याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे प्रयत्न असतील, असे राज्य सरकारने सांगितले. त्यानंतर एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कामावर यायला पाहिजे, असे पवार म्हणाले. सरकार तुमच्या इतर प्रश्नांवरही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करेल, अशी ग्वाही यावेळी पवारांनी दिली.

कृती समिती आणि कामगार समितीचे जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा कामगारांच्या हिताबद्दलचा जो अर्ज आहे, त्यात प्रवाशांचे हित आणि एसटी टिकली पाहिजे, याबाबत उल्लेख आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे, ही आनंदाची बाब असल्याचे पवार म्हणाले. आम्ही कामगारांच्या समस्या मनावर घेणार नाही, असा समज काही लोकांनी पसरवला होता, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे हा संप सोडवायला दोन महिने लागले. अन्यथा एवढा वेळ लागलाच नसता. तसेच आम्ही हा संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे शरद पवारांनी सांगितले.

तुम्ही सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील, असे आवाहन शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. तर एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे पवार म्हणाले.