नोवाक जोकोविचला त्याच्या वकिलासोबत हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी


मेलबर्न – ऑस्ट्रेलियात प्रवासासाठी जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला मनाई करण्यात आली आहे. जेव्हा मेलबर्नमध्ये जोकोविच पोहोचला, तेव्हा त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्याला त्यानंतर मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आल्यामुळे क्रिडाविश्वात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता मेलबर्न न्यायालयात हे प्रकरण पोहोचले आहे. न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. जोकोविच न्यायालयाकडून सुनावणी दरम्यान दिलासा मिळाला आहे. जोकोविचला त्याच्या वकिलासोबत हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय सवलत हा आधार घेऊन लसीकरणाविना ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या जोकोविचचा मुक्काम लांबणार की त्याला मायदेशी परत पाठवले जाणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

जोकोविच बुधवारी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल झाला. पण, त्याला आठ तासांहून अधिक वेळ विमानतळावरच थांबवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी नागरिकांसाठी ऑस्ट्रेलिया सरकारने नवी नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी दिली आहे. लसीकरणाचा नियम न पाळल्यामुळे ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केल्यानंतर त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेले.

गेल्या चार दिवसांपासून स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये जोकोविचला थांबवण्यात आले आहे. दरम्यान, जोकोविचचा व्हिजा स्वीकारण्यासाठी आणि ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी मेलबर्नच्या न्यायालयात व्हर्चुअल सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी भारतीय वेळेनुसार आज पहाटे 4.30 वाजल्यापासून सुरू आहे.