दोन खटल्यांमध्ये न्यायालयाने सुनावली म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांना आणखी चार वर्षांची शिक्षा


नेपीडाव – देशाच्या निर्वासित नेत्या आंग सान स्यू की यांना आणखी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा म्यानमारच्या एका न्यायालयाने सुनावली आहे. त्यांना ही शिक्षा कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीरपणे वॉकी-टॉकी आयात केल्याबद्दल सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी सू की यांना ६ डिसेंबर रोजी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि लोकांना भडकावण्याच्या इतर दोन आरोपांसाठी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा नंतर दोन वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आणि त्यांना नेपीडाव शहरात नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, हा संपूर्ण खटला खोटा असल्याचे म्हणत आंतरराष्ट्रीय समुदायाने जोरदार टीका केली होती आणि स्यू की यांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली होती.

७६ वर्षीय नोबेल पारितोषिक विजेत्या स्यू की यांच्यावर जवळपास डझनभर खटले सुरू आहेत. ज्यात त्यांना १०० वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या वर्षी १ फेब्रुवारी रोजी स्यू की यांचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार लष्कराने उलथून टाकले होते. त्यानंतर स्यू की यांचे सरकार आणि पक्षाच्या नेत्यांवर खटले सुरू आहेत. सत्तापालटाच्या दिवशी स्यू की यांना ताब्यात घेण्यात आले आणि काही दिवसांनंतर पोलीस दस्तऐवजात असे म्हटले गेले की त्यांच्या घराच्या झडतीदरम्यान सहा बेकायदेशीरपणे आयात केलेल्या वॉकी-टॉकी सापडल्या होत्या. त्या प्रकरणी त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यावर सुनावणी झाली आणि त्यांना ४ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.