हार्दिक पांड्याला आयपीएलच्या अहमदाबाद फ्रँचायझीने दिली कर्णधार पदाची जबाबदारी


अहमदाबाद टीमने आयपीएल 2022 साठी फिटनेसच्या समस्येला तोंड देणाऱ्या हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, स्टार क्रिकेटर हार्दिकला मुंबई इंडियन्सने पुढच्या सीझनसाठी रिटेन केले नव्हते. दरम्यान हार्दिक 2019 पासूनच फिटनेसच्या समस्येला तोंड देत आहे. त्याने पाठीची सर्जरी सुद्धा केली आहे. तरीही फिटनेस नसल्यामुळे तो गोलंदाजीत फेल ठरत होता. आयपीएलच्या गेल्या हंगामामध्ये त्याने बॉलिंग केलीच नव्हती. टी-20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये सुद्धा तो बॉलिंग करू शकला नसल्यामुळेच एकीकडे त्याला भारतीय क्रिकेट संघामधून आपले स्थान गमवावे लागले. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने सुद्धा रिटेन करण्यास नकार दिला.

तज्ज्ञांच्या मते, पांड्या गुजरातचा असल्यामुळे लोकांमध्ये आपल्या टीमविषयी जिव्हाळा निर्माण करण्यासाठी, टीमची फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी अहमदाबाद फ्रँचायझीने हा निर्णय घेतला. अशात टीममध्ये कॅप्टन झाल्यानंतर हार्दिकने गोलंदाजी नाही केली, तरीही त्याच्या प्रसिद्धीचा टीमला फायदा होऊ शकतो. तसेच हार्दिक पांड्यासह अहमदाबादच्या या आयपीएल टीममध्ये अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान सुद्धा सामिल झाल्याचे वृत्त आहे. आयपीएलच्या यापूर्वीच्या सीझनमध्ये राशिद हैदराबाद संघात होता. यावेळी तो स्वतः हैदराबाद संघातून बाहेर पडला होता.