पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने द्यावेत निर्बंध पाळण्याचे आदेश : संजय राऊत


मुंबई : देशात सध्याच्या घडीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर हा दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रात भयावह अशा प्रकारची स्थिती आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची नोंदच होत नसल्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशमध्ये काय होईल हे सांगता येत नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. काही निर्बंध निवडणूक आयोगाने घातले आहेत, त्यांनी ऑनलाईन प्रचार करा, असे सांगितले आहे. पण हे कागदावर सगळे ठिक आहे. पण, याप्रकारचे स्पष्ट आदेश पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने द्यावेत. कारण त्यांच्यासाठी कोणते नियम नसतात. त्यांचे नियम इतरांसाठी असतात. हे आम्ही बघितले असल्यामुळे आचारसंहितेच्या बाबतीत तरी समान कायदा असावा, असे राऊत यावेळी म्हणाले.

निवडणुका वेळेत निवडणूक आयोगाने जाहीर केल्या हे ठीक आहे, पण, लोकांचे आरोग्य, त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, याचा विचार निवडणूक आयोगाने केला नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तसेच काही दिवस निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, पण निवडणुका उरकण्याची घाई काही जणांना झाल्याचे राऊत म्हणाले. निवडणुका होत असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चांगली नसल्यामुळे नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत. त्यांनी पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना निर्बंध पाळण्याचे आदेश द्यावेत, असे राऊत म्हणाले.

दरम्यान काँग्रेसबरोबर गोव्यात आघाडी व्हावी, असे आम्हाला सतत वाटत असल्यामुळे आम्ही आणखी आघाडी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे राऊत म्हणाले. गोव्यात महाराष्ट्रासारखा एक प्रयोग करावा, असे आम्हाला वाटत आहे. आम्ही यासाठी मनापासून प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न केले. पण, त्यांना वाटते की, गोव्यात ते स्वबळावर सत्ता आणू शकतात. गोवा काँग्रेसने तसे संकेत दिल्लीत दिले असतील, त्यामुळेच ते मागे पुढे करत आहेत. आम्हाला काही जागा काँग्रेसने ऑफर केल्या आहेत, पण आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळे एकत्र निर्णय व्हायला हवा, असेही राऊत यावेळी म्हणाले. आम्हाला जागा ऑफर केल्या म्हणजे आम्ही लगेच जाऊ असे नसल्यामुळे आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाहीतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

तसेच आत्तापर्यंत भाजपने गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला तिकीट दिले नाही, मग शिवसेना त्यांना तिकीट देणार का? असा सवाल संजय राऊत यांना केला असता राऊत यांनी सांगितले की, उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. जर पर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवेसेनेबरोबर संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना नक्कीच त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल, असे राऊत म्हणाले. उत्पल पर्रिकर यांच्या वडिलांनी भाजपला गोव्यात एक स्थान निर्माण करुन दिले आहे. भाजप गोव्यात त्यांनी रुजवली आहे. त्यांच्याच प्रतिमेवर गोव्यात भाजप टिकला आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांच्यावर अवलंबून आहे, त्यांनी काय करावे ते, शेवटी राजकारणात धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. भाजपला मुख्य पर्याय म्हणून भविष्यात गोव्याचे लोक शिवसेनेचा विचार करतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सध्या जमिनीवर चार हात चालत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कधी काळी गोव्यातही भाजपला कोणी विचारत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या काळात गोव्यात भाजप राहते की शिवसेना राहते हे कळेल असेही राऊत म्हणाले.