‘बाहुबली’च्या ‘कटप्पा’ला कोरोनाची लागण


देशासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. अनेक बॉलिवूड कलाकार, अभिनेते-अभिनेत्री यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता ‘बाहुबली’ या प्रसिद्ध चित्रपटात ‘कटप्पा’ची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सत्यराज यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर काही दिवस ते होम आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर सत्यराज यांना कोरोनाची गंभीर लक्षणे दिसू लागली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, सध्या चेन्नईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे चाहते सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत आहेत.

कोरोनाची लागण अभिनेते सत्यराज व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांना झाली आहे. अभिनेता विष्णू विशालपासून महेश बाबू, शोभना, मधुर भांडारकर, सोनू निगम, अर्जुन रामपाल, एकता कपूर आणि राजेंद्र प्रसादपर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.