रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय ; १० ते ५० रुपयांनी महागणार रेल्वेचे तिकीट


नवी दिल्ली – आता रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे महागणार आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी तसेच पुन:बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा निधी आता टिकिटांवर अतिरिक्त पैसे आकारुन उभारला जाणार आहे. या पैशांना स्टेशन डेव्हलपमेंट फी, असे नाव देण्यात आले आहे.

ही रक्कम प्रत्येक प्रवाशाकडून तो कोणत्या श्रेणीने प्रवास करत आहे, यानुसार किती असेल हे निश्चित केले जाणार आहे. सर्वासामान्यपणे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये (म्हणजेच फर्स्ट क्लास, एसी क्लास) प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक तिकीटामागे १० ते ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. रेल्वेने हे शुल्क आकारण्यासंदर्भात वेगवेगळे नियम निश्चित केले आहेत. यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे निर्देशक (प्रवासी विपणन) विपुल सिंघल यांनी एक अधिकृत पत्र जारी करुन माहिती दिली आहे. वेगवेगळ्या प्रमाणात ही एसडीएफ म्हणजेच स्टेशन डेव्हलपमेंट फीज आकारली जाणार आहे.