कोरोना निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची १६ भरारी पथके


पुणे – राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने कंबर कसली असून आता पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरासाठी १६ भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकांकडून निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार आहे. विनामास्क फिरल्यास ५०० रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

मुंबई, पुणे पाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाकडून त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कडक निर्बंध लागू केले असून जमावबंदी व संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडून गर्दी करीत असल्याचे दिसून येते. रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दरम्यान ओमिक्रॉन पाठोपाठ कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. एक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी अशा पाच जणांचे एक पथक राहणार आहे. प्रत्येक पथकाने त्यांच्या हद्दीत पाहणी करण्यात येणार आहे. निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे.