नोकरी गेली तरी बेहत्तर, मिशा भादरणार नाही, पोलिसाचा बाणेदारपणा

भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी एफ १६ विमानाला हद्दीबाहेर खदेडताना पाक हद्दीत विमान कोसळून बंदी झालेले आणि नंतर मोठ्या सन्मानाने परतलेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झालेले अनेकांना आठवणीत असेल. अभिनंदन यांच्या खास मिशा त्यावेळी खूपच लोकप्रिय ठरल्या होत्या. अनेकांनी त्यांची नक्कल करून तशा मिशा ठेवल्या होत्या. मध्यप्रदेशातील एका पोलीस कॉन्स्टेबल वर मात्र अश्या मिशा ठेवल्याने बडतर्फ होण्याची नौबत आली आहे.

हकीकत अशी की, मध्यप्रदेश पूल भोपाल को ऑप फ्रॉड व लोक सेवा गॅरंटी विभागाचे विशेष पोलीस महानिदेशक यांचा वाहन चालक म्हणून काम करत असलेल्या राकेश राणा यानेही ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांच्या प्रमाणे मिशा वाढविल्या तेव्हा त्याला दोन दिवसापूर्वी एआयजी प्रशांत शर्मा यांनी सस्पेंड केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार युनिफॉर्म सेवा अनुशासन प्रमाणे केस बारीक कापणे आणि मिशा व्यवस्थित आणि प्रमाणित नमुन्याप्रमाणे ठेवणे बंधनकारक आहे. राणा यांचे केस वाढलेले होते आणि मिशा विचित्र आकारात होत्या त्या कापण्यास  यापूर्वी सांगून सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना सस्पेंड केले गेले आहे.

दुसरीकडे राणा याने तो राजपूत आहे आणि नोकरी गेली तरी बेहत्तर, पण मिशा कापणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांना मिशा हव्यातच. पोलीस जवान यामुळेच चटकन ओळखता येतात. उत्तर प्रदेशात पोलिसांमध्ये मिशांचे आकर्षण वाढावे म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. खास मिशा ठेवणाऱ्याना बक्षिसे, मिशी देखभाल खर्च दिला जात आहे. मिशी भत्ता ५० रुपयांवरून २५० वर नेला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मिशा कापण्यासाठी सस्पेंड करण्याची शिक्षा विशेष चर्चेत आली आहे.