सायप्रस मध्ये सापडला डेल्टाक्रॉन
जगात कोविडच्या डेल्टा आणि नव्या ओमिक्रोनची दहशत वाढत चालली असतानाच अजून एका नव्या व्हेरीयंटची एन्ट्री सायप्रस येथे झाली आहे. नवे व्हेरीयंट डेल्टा आणि ओमिक्रोनच्या मिलापातून तयार झाले असून त्याला डेल्टाक्रॉन असे नाव दिले गेले आहे. बायोटेक्नॉलॉजी व मोलेक्यूलर व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुख व युनिव्हर्सिटी ऑफ सायप्रसचे प्रोफेसर लियोनडीओस कोस्त्रीकिस यांनी या संदर्भात अहवाल दिला आहे.
त्यांच्या अहवालानुसार सायप्रस मध्ये या नव्या व्हेरीयंटच्या २५ केसेस आढळल्या आहेत. ज्यांना करोना संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले त्यातील बहुतेक संक्रमितांमध्ये दुहेरी संक्रमण झाल्याचे दिसले आहे. या नव्या व्हेरीयंट मध्ये डेल्टा आणि ओमिक्रोनचा मिलाप आहे. नवे व्हेरीयंट किती वेगाने संक्रमित होईल किंवा जुन्या व्हेरीयंटवर भारी पडण्याची संभावना किती या बाबत अजून काही सांगता आलेले नाही. काही संधोधकानी नव्या व्हेरीयंटला डेलनिक्रोन असे म्हटले आहे.
या संक्रमितात दोन्ही व्हेरीयंटची लक्षणे दिसली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजून जागतिक आरोग्य संघटना किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने या नव्या व्हेरीयंट ला स्वीकृती दिलेली नाही. सध्या जगात ओमिक्रोनची त्सुनामी असून ६४ देशात रेकॉर्ड केसेस नोंदल्या गेल्या आहेत. जेथे लसीकरण झाले आहे तेथेही हे संक्रमण झाल्याचे दिसते आहे. जागतिक आकडेवारीनुसार जगात १९१ देशांपैकी ४६ देशात १० लाखाहून अधिक संक्रमित आढळत असून हे नवीन संक्रमण सर्वोच्च स्तरावर गेले आहे.