शाहरुखचा ‘मन्नत’ बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अटकेत

किंग खानचा प्रसिद्ध ‘मन्नत’ बंगला बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. जितेश ठाकूर असे या व्यक्तीचे नाव असून तो जबलपूरचा राहणारा आहे. प्राथमिक चौकशीत दारूच्या नशेत याने हे कृत्य केल्याचे आढळले आहे असे समजते. मिळालेल्या माहितीनुसार ६ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांना आलेल्या एका अज्ञात फोनवरून एका व्यक्तीने मुंबईत लोकप्रिय स्थळे आणि बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मन्नत बंगला बॉम्बने अडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांची एकाच धावपळ उडाली होती.

या फोनकॉल मुळे एकच गोंधळ माजला होता आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करून फोन जबलपूर येथून आल्याचे शोधले आणि जबलपूर पोलिसांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. कॉलची पूर्ण माहिती दिली गेल्यावर जबलपूर पोलिसांनी जितेश याला अटक केली आहे.

मध्यप्रदेश सीपीएस अलोक शर्मा म्हणाले, मुंबई पोलिसांकडून बॉम्बस्फोट धमकीसंदर्भातला फोन आल्यावर आणि त्यांनी मदतीची विनंती केल्यावर आम्ही तपास करून जितेश याला त्याच्या घरातून अटक केली आहे. यापूर्वीही अनेक गुन्हेगारी कृत्यात त्याला पकडले गेल्याचे उघड झाले आहे. दारूच्या नशेत आणि त्याचे वैवाहिक जीवन ठीक नसल्याने तो अशी कृत्ये करतो असे चौकशीत उघड झाले आहे. त्याच्यावर आयपीएस १८२,५०५ आणि ५०६ खाली गुन्हा दाखल केला गेला असून मुंबई पोलिसांकडे त्याचा ताबा दिला जाणार आहे.