या राज्यांच्या कोविड लस सर्टिफिकेट वर मोदींचा फोटो नाही

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या पाच राज्यांना कोविड लस सर्टिफिकेट वरून पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटविण्याचे आदेश दिले आहेत. या राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने हा आदेश दिला गेल्याचे समजते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी कोविन प्लॅटफॉर्मवरून फोटो हटविण्यासाठी आवश्यक फिल्टर लावला जात असल्याची घोषणा शनिवारी केली आहे.

उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात १० फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. सात टप्प्यात हे मतदान होत असून मतमोजणी १० मार्च ला होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता या पाच राज्यात लागू झाली आहे. यापूर्वी मार्च २०२१ मध्ये स्वास्थ मंत्रालयाने काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतल्यावर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आसाम, केरळ, तामिळनाडू, प. बंगाल आणि पुडुचेरी येथील विधानसभा निवडणुकात असेच पाऊल उचलले होते.