तीन तपांचा अंधविश्वास तोडणार योगी आदित्यनाथ

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वांचे लक्ष उत्तरप्रदेश निवडणुकीकडे लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ गेल्या ३६ वर्षांचा अंधविश्वास तोडणार अशी चर्चा सुरु झाली आहे. गोरखपूरचे मठाधिपती असलेले योगी आदित्यनाथ अंधविश्वास मानत नाहीत आणि त्यांची वर्तुणूक त्याला साजेशी असते. उत्तर प्रदेशात गेली ३६ वर्षे एक मुख्यमंत्री सलग दुसऱ्या वेळी पुन्हा मुख्यमंत्री बनू शकलेला नाही. १९८५ मध्ये एन.डी तिवारी सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनले होते त्यानंतर पुन्हा ही संधी कुठल्याच मुख्यमंत्र्याला मिळालेली नाही. मात्र योगी आदित्यनाथ यांना ते पुन्हा बहुमताने मुख्यमंत्री बनतील याची खात्री असून निवडणूक पूर्व झालेल्या सर्व्हेक्षणात भाजपला बहुमत मिळेल असे निष्कर्ष निघाले आहेत. भाजपने योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उत्तर प्रदेशात प्रमोट केले आहे.

यापूर्वीही आदित्यनाथ यांनी असे अनेक भ्रम तोडले आहेत. उत्तरप्रदेशात बीजेपीचा कुठलाच मुख्यमंत्री तीन वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेत राहू शकलेला नाही. भाजपचे येथे चार मुख्यमंत्री झाले. कल्याणसिंग १९९१ मध्ये पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री बनले पण १९९२ मध्ये बाबरी प्रकरणात त्यांचे सरकार बरखास्त केले गेले होते. योगी यांनी मात्र मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा काळ पूर्ण केला आहे.

नॉइडा संदर्भात सुद्धा असाच एक अंधविश्वास गेली ३० वर्षाहून अधिक काल प्रचलित आहे. जो मुख्यमंत्री नॉइडाला भेट देतो त्याची खुर्ची जाते असे म्हटले जाते.१९८८ मध्ये तत्कालीन सीएम वीर बहादूर सिंग यांना नॉइडा भेटीनंतर राजीनामा द्यावा लागला होता. त्या भीतीने एन डी.तिवारी, मायावती, कल्याणसिंग, अखिलेश यादव यांनी नॉइडा भेट नेहमीच टाळली. अखिलेश यादव २०१३ मध्ये आशियाई बँक शिखर परिषद तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नॉईडा येथे झाली तेव्हाही आले नव्हते. शिवाय यमुना एक्स्प्रेसवेचे उद्घाटन सुद्धा त्यांनी लखनौ मधून केले होते. मुलायमसिंग यादव, राजनाथसिंग यांनीही कधी मुख्यमंत्री असताना नोइडा भेट दिली नाही. योगी आदित्यनाथ यांनी मात्र अनेकदा नॉइडाला भेट दिली आहे. इंडस्ट्रीयल हब उद्घाटन, बोटेनिकल गार्डन उद्घाटन, मेट्रो लाईन, सॅमसंग कारखाना उद्घाटन अश्या अनेक कार्यक्रमाना ते येथे आले आहेत.

आग्रा सर्किट हाउस संदर्भात सुद्धा असाच एक अंधविश्वास आहे. १६ वर्षांपूर्वी राजनाथसिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना येथे राहिले आणि नंतर त्यांची खुर्ची गेली. तेव्हापासून हा समज प्रचलित आहे. मुलायमसिंग, मायावती, अखिलेश यादव यांनी आग्रा भेट दिली पण त्यांनी नेहमीच पंचतारांकित हॉटेल मध्ये मुक्काम केला. २०१८ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी याच सर्किट हाउस मध्ये मुक्काम टाकून त्याविषयीचा समज खोटा ठरविला होता.