चीनच्या या शहरातील सर्व नागरिकांची होतेय करोना चाचणी

चीनच्या उत्तर किनाऱ्यावरील तियान्जिन शहरातील सर्व १ कोटी ४० लाख नागरिकांची करोना चाचणी सुरु केली गेली असल्याचे चीनी मिडिया मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या शहरात करोनाच्या केसेस वाढत असून त्यातील दोन ओमिक्रोनच्या आहेत असे समजते. देशाची राजधानी बीजिंग येथे लवकरच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. तीयान्जिंन मधील वाढत्या करोनाचा धोका बीजिंग पर्यंत येऊ शकतो हे लक्षात घेऊन आणि हिवाळी ऑलिम्पिकवर करोनाचे सावट राहू नये यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

त्यादृष्टीने तीयान्जिंग शहराची विभागणी करण्यात आली असून चार प्रभागात शनिवारी २४ तासात सर्व रहिवाशांची करोना चाचणी केली गेली असून दोन दिवसात उर्वरीत भागातील रहिवाशांच्या चाचण्या होणार आहेत. ज्यांच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांना ग्रीन हेल्थ कार्ड कोड दिला जाणार आहे. शहरात लॉकडाऊन लावला जाणार नाही असेही स्पष्ट केले गेले आहे. शनिवारी या शहरात १६५ करोना संक्रमित सापडले असे जाहीर केले गेले आहे.