आपल्या जीवनसाथीला खूश ठेवण्याच्या या काही टिप्स


आपली जीवनसाथी अर्थात पत्नीला कोणतीही महागडी भेटवस्तू दिली तर ती खूश होते असा आपल्यापैकी अनेकजण विचार करतात. पण त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. कोणतेही नाते हे पैशांवर नाही तर भावनेवर टिकते. तुमचे हेच नाते टिकवण्यासाठी आणि आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहोत. ज्याच्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अजूनच दृढ होईल.

तुमची पत्नी महागड्या हिऱ्याच्या अंगठीपेक्षा एक गुलाबाचे फुल दिले तरी खूश होईल. कारण कोणत्याही नात्यात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट प्रेम असते. तुमच्या नात्यात जर प्रेमच नसेल तर बाकी सर्व निरर्थक ठरते. तुम्ही पत्नीसाठीचे प्रेम आणि आत्मियता सांगत रहाल तर तुमच्यातील प्रेम कधीच कमी होणार नाही.

ऑफिसच्या कामात तुम्ही कितीही व्यस्त असला तरी हे विसरू नका की जेवढे तुमचे काम महत्त्वाचे आहे तेवढेच तुमचे नाते देखील महत्वाचे असल्यामुळे पत्नीला वेळ देणेही क्रमप्राप्त आहे. तुम्ही तिच्यासोबत आहात असा विश्वास दाखवा. तुमची पत्नी हाउस वाइफ असो किंवा वर्किंग वुमन तिच्याशी दिवसातील काही वेळ तरी बोलाल याकडे लक्ष द्या. तुम्ही जेवताना किंवा झोपताना काही वेळ एकत्र काढाल असा प्रयत्न करा. तिचा पूर्ण दिवस कसा गेला याबद्दल पत्नीला विचारा आणि त्यानंतर स्वतःच्या दिवसाबद्दल सांगा. यामुळे एक घट्ट नाते तयार होते.

तिच्या प्रत्येक गोष्टीवर होकारार्थीच बोलले पाहिजे असे काही गरजेचे नसून असे केले तर तिला वाटेल तुमचे तिच्या बोलण्याकडे लक्ष नसल्यामुळे परिस्थितीनुसार पत्नीच्या बोलण्याचे उत्तर तुम्ही देणे गरजेचे आहे. फक्त पत्नीचीच घर आणि मुले सांभाळण्याची जबाबदारी नाही हे लक्षात ठेवा. संसारातील प्रत्येक गोष्टी या दोघांनी मिळून करायच्या असतात. एकाच्याच खांद्यावर जर या दोन्ही गोष्टी गेल्या तर एकाची चीडचीड होते आणि नात्यात कटूता येते.

कधीही एकत्र फिरायला जायला विसरू नका. तुम्ही संपूर्ण आयुष्यात यावेळी एकत्र घालवलेले क्षण कधीही विसरू शकणार नाहीत. यामुळे माणूस म्हणून तुम्ही प्रगल्भ तर होतातच शिवाय एकमेकांना समजून घ्यायला अधिक मदत होते. पत्नीचे आभार माना.. कारण तुमच्यासाठी ती स्वयंपाक करण्यापासून ते संसाराच्या प्रत्येक जबाबदाऱ्या सांभाळण्याचे काम करते. यात अनेकदा तिची तारेवरची कसरतही होते. तिच्या या कामाबद्दल आभार व्यक्त केले तर तिला देखील तेवढेच चांगले वाटेल.

फक्त पत्नीचेच स्वयंपाक करणे हे काम आहे असा कोणताही नियम नाही. संपूर्ण स्वयंपाक करणे तुम्हाला येत नसले तरी तिला किचनमध्ये थोडीफार मदत करा. पत्नीच्या आवडीची डिश कधी तयार करा आणि तिला सरप्राइज द्या. हे तिच्यासाठी कोणत्याही मौल्यवान भेटवस्तूपेक्षा कमी नसेल. तुम्ही माफी मागितल्याने लहान आणि पत्नी मोठी होईल असा गैरसमज करुन घेऊ नका. पण माफी मागताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही मागितलेली माफी मनापासून आहे की नाही हे पत्नीला लगेच कळू शकते. शिवाय जिथे माफी मागण्याची गरज आहे तिथे नक्की माफी मागा. यात कुठेही इगो आणू नका.

Leave a Comment