आतापर्यंत देशात कोरोनामुळे झाला एवढ्या लोकांचा मृत्यु; सायन्स जर्नलच्या अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर


नवी दिल्ली – सायन्स जर्नलमध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोरोनामुळे भारतात मृत्यू झालेल्या लोकांची वास्तविक संख्या ही नोंदवलेल्या आकड्यांच्या सहा पट असू शकते. आतापर्यंत भारतात ४ लाख ८३ हजार १७८ मृत्यूंची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. पण सायन्स जर्नलच्या अभ्यासानुसार देशभरात कोरोनामुळे अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अंदाजे यापैकी ७१ टक्के म्हणजेच तब्बल २७ लाख मृत्यू झाले, असे संशोधकांना आढळले आहे. त्याचबरोबर या अभ्यासात असे म्हटले आहे की या काळात कोरोनामुळे मृत्यूदर दुप्पट झाला होता. अभ्यासात असे म्हटले आहे की आपण जर अधिकृत आकडेवारी पाहिली, तर भारतात दर दहा लाख लोकांमागे ३४५ मृत्यू झाले आहेत, जे अमेरिकेतील कोरोना मृत्यू दराचा सातवा भाग आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे अपूर्ण प्रमाणीकरण आणि या मृत्यूंमागील इतर आजारांची कारणे दिल्याने, खरा आकडा समोर आलेला नाही. तसेच, सर्वाधिक मृत्यू हे ग्रामीण भागात झाले असून, त्यांची नोंद होऊ शकली नसल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे.

संशोधकांनी अभ्यासासाठी १० राज्यांमधील १.४ लाख लोकांचे फोनवरून सर्वेक्षण केले. तसेच, दोन लाख सरकारी आरोग्य केंद्र आणि नागरिक नोंदणी प्रणालींमधून झालेल्या मृत्यूंचा डेटा गोळा केला. या अभ्यासासाठी संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाचा डेटाही घेण्यात आला होता.

याबाबत माहिती देताना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलीयल म्हणाले की, भारतात महामारी पोहोचेपर्यंत त्यांनी युरोपच्या दराच्या आधारे मृत्यूदराचा अंदाज लावला होता. ते म्हणाले, माझ्या अंदाजानुसार, भारतात सुमारे २२ लाख मृत्यू झाले असते. पण केवळ हजारो मृत्यूंची नोंद होत आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. माझ्या मते भारतात कोरोनामुळे किमान ३० लाख मृत्यू झाले आहेत.