पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांची पत्नी, मुलगा आणि सुनेला कोरोनाची लागण


अमृतसर – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या कुटुंबातील काही जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या पत्नी, मुलगा आणि सूनेला कोरोनाची लागण झाली आहे. तर मुख्यमंत्री चन्नी यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. याबाबत माहिती देतान मोहालीचे सिव्हिल सर्जन आदर्शपाल कौर यांनी शनिवारी सांगितले, की मुख्यमंत्र्यांच्या पत्नी डॉ. कमलजीत कौर, त्यांचा मुलगा नवजीत सिंग आणि सून सिमरनधीर कौर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि आता ते खरारमध्ये होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर मुख्यमंत्र्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याचे डॉ. आदर्शपाल कौर यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री चन्नी यांनी चंदीगड येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूरमधील कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे कारण सांगताना त्यांचे सचिव हुसन लाल आणि एका स्वीय सहाय्यक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच पंतप्रधानांना रिसीव्ह करायला भटिंडाला गेलो नसल्याचे ते म्हणाले होते.

परंतु, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे बाहेर फिरतानाचे व्हिज्युअल्स व्हायरल झाले होते, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी दिलेले कारण खरे होते की नाही, अशी चर्चा सुरू होती. त्यातच आता त्यांच्या पत्नी, मुलगा आणि सूनेला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.