महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या


मुंबई : कोरोना महामारीचा विस्फोट देशासह राज्यात पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाची लागण निवासी डॉक्टरांना देखील झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्भूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता येत्या 14 फेब्रुवारी 2022 पासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. हा निर्णय राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घेण्यात आला आहे.

दरम्यान 17 जानेवारी 2022 पासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा या 28 फेब्रुवारी 2022 पासून घेण्यात येणार आहेत. तर 31 जानेवारी 2022 पासून पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु होणार होत्या. राज्यात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीस विद्यापीठाचे कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.