आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; चित्रा वाघ यांची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आगपाखड


मुंबई – भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांना दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आशिष शेलार यांनी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. एक अज्ञात इसम शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

विखारी भाषा वापरत आशिष शेलार आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कित्येक तास धमकी देऊन उलटले, तरी कायदा सुव्यवस्था सुस्त पडली आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का? राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात असल्यामुळे राज्यामध्ये सरकार नावाची कोणती गोष्ट शिल्लक आहे का? मुख्यमंत्री स्वतः हॉलिडे मूडमध्ये आहेत तर गृहमंत्री विकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत. कशाप्रकारे अंधाधुंदी राज्यामध्ये चालू असल्याचे आपण पाहत आहे. त्यामुळे २४ तासांच्या आत आशिष शेलार यांना ज्याने धमकी दिली आहे, त्याच्या मुसक्या आवळा. शेलार आणि त्यांच्या परिवारातील सदस्याला काही झाले, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर असणार आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

सरकारच्या विरोधात जे जे भाजप नेते पुढे येऊन आवाज उठवत आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील, तर राज्यात सरकार आहे का हा प्रश्न निर्माण होतो, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी बोलताना रश्मी ठाकरे प्रकरणावरुन सुरु असलेल्या वादात अमृता फडणवीस यांना ओढल्यामुळे चित्रा वाघ संतापल्या. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

सत्ताधारी पक्षाच्या महिलांचा सन्मान आणि इतर महिलांची इज्जत कचरा आहे का? असभ्य भाषेचे कोणीही समर्थन करत नाही. पण असभ्य भाषा वापरल्याचे म्हणत कारवाई झाली तर विद्या चव्हाण यांच्यावर पोलीस कारवाई कधी करणार? आम्ही वाट पाहत आहोत की मुंबई पोलीस विद्या चव्हाण यांच्यावर कारवाई कधी करणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.