राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला टकलू लोकांकडून प्रचंड समर्थन

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकात टक्कल हा महत्वाचा मुद्दा ठरू शकेल यावर सहसा कुणी विश्वास ठेवणार नाही. पण दक्षिण कोरियात होत असलेल्या आगामी राष्ट्रपतीपद निवडणुकातील उमेदवार ली जे म्युंग यांना मात्र टकलू किंवा टक्कल पडण्याच्या मार्गावर असलेल्या लोकांकडून अभूतपूर्व समर्थन मिळताना दिसते आहे. या मागचे कारण अजब आहे. ली यांनी काही दिवसांपूर्वी टक्कल पडू लागलेल्या लोकांना पुन्हा केस यावे यासाठी जे उपचार घ्यावे लागतात त्याचा समावेश राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत कव्हर केला गेला पाहिजे असे वक्तव्य केले होते आणि यामुळेच त्यांना टकलू लोकांनी मोठ्या प्रमाणावर समर्थन दिले आहे.

विशेष म्हणजे ली जे म्युंग यांना स्वतःला टक्कल नाही किंवा त्यांना केस गळतीचा त्रास नाही. पण द. कोरियात प्रत्येक ५ व्यक्तींमागे एकाला तरुणपणातच केस गळतीचा त्रास सुरु होत आहे आणि त्यामुळे अनेकांना केस पुन्हा यावेत यासाठी उपचार घ्यावे लागत आहेत. हे उपचार महाग आहेत आणि त्यासाठीची औषधे अनेकदा परदेशातून मागवावी लागतात. यामुळे ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांना हे उपचार करून घेणे शक्य होत नाही असे समजते. कोरियात सध्या किमान १ कोटी नागरिकांना केस गळतीची समस्या भेडसावते आहे असे आकडेवारी सांगते.

ली यांनी हे उपचार सरकारी मदतीतून केले जावेत असे वक्तव्य केल्यामुळे द. कोरियातील टकलू अतिशय समाधानी आहेत. सोशल मिडीयावर त्या संदर्भात प्रतिक्रियांचा पाउस पडला असून अनेकांनी ली यांना ‘तुम्ही टकलू लोकांचा उत्साह वाढविण्याचे काम प्रथमच देशात केले आहे, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो’ असे कळविले आहे.