मुलांना कोविड लसीनंतर पेनकिलर नको- भारत बायोटेक

देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड १९ लसीकरण सुरु झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या या वयोगटासाठी फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जात आहे. पण अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून मुलांना पॅरासीटामोल किंवा पेन किलर देण्यास सांगितले जात आहे. त्याबाबत भारत बायोटेकने ट्वीट केला आहे. ट्वीट मध्ये लस दिलेल्या मुलांना पेन किलरची गरज नाही असे स्पष्ट केले गेले आहे.

कंपनीने कळविले आहे की लसीचे काही दुष्परिणाम दिसले तर पॅरासिटामोल किंवा अन्य पेन किलर घेण्याचा सल्ला केंद्रावर दिला जात आहे व अनेक ठिकाणी गोळ्यांचे डोस बरोबर बांधून दिले जात आहेत. अन्य कोविड १९ लसीसाठी या डोसची शिफारस केली जात असेल तरी कोवॅक्सिन साठी त्याची गरज नाही. या लसीच्या ३० हजाराहून अधिक क्लिनिकल ट्रायल झाल्या आहेत आणि फक्त १० टक्के मुलांत अंगदुखी. क्वचित ताप असे दुष्परिणाम दिसले आहेत. त्यामुळे मुलांना लस दिल्यावर औषध देण्याचे गरज नाही. अगदीच गरज वाटली तर डॉक्टरचा सल्ला घेऊन मगच पेन किलर द्यावे. लस घेतल्यावर मुलांना पॅरासीटामोल किंवा पेन किलर दिले गेले तर त्याचा परिणाम मुलांच्या यकृतावर होण्याची शक्यता असल्याचा इशारा भारत बायोटेकने दिला आहे.

देशात फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षावरील व्यक्तींना प्रीकॉशन किंवा बुस्टर डोस देण्याची सुरवात १० जानेवारी पासून होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यासाठी वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही. हे सर्व लाभार्थी थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकणार आहेत. दुसरा डोस घेतल्यावर ३९ आठवडे झालेले सर्व बुस्टर डोस साठी पात्र आहेत.