२० वर्षाची परंपरा मोडून योगी आणि अखिलेश विधानसभा रिंगणात उतरणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असताना गेली २० वर्षे चालत आलेली रूढी किंवा परंपरा मोडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रमुख विरोधी समाजवादी पक्ष नेते अखिलेश यादव त्यांच्या राजकीय इतिहासात प्रथमच विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. उत्तर प्रदेशात १९८९ पासून आलेले सर्व मुख्यमंत्री विधानसभेचे आमदार म्हणून नाही तर विधान परिषदेतून मुख्यमंत्री बनले आहेत. पण यंदा प्रथमच योगी आणि अखिलेश यादव त्यांची लोकप्रियता शाबित करण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवतील असे सांगितले जात आहे. हे दोघेही आत्तापर्यंत खासदार म्हणून लोकसभेची निवडणूक जिंकत आले आहेत आणि मुख्यमंत्री बनले तेव्हा विधान परिषदेवरून विधानसभेत आले आहेत.

१९८९ नंतर विधानसभेतून नाही तर विधान परिषदेतून विधानसभेत आलेल्यात मायावती, मुलायमसिंग यादव, पुन्हा मायावती, अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यंदा अयोध्येतून विधानसभा रिंगणात उतरतील असे सांगितले जात आहे. अखिलेश यादव आझमगड, मैनपुरी किंवा इटावा येथून निवडणूक लढवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे भाग यादवबहुल म्हणून ओळखले जातात. योगी आदित्यनाथ त्यांची कर्मस्थळी गोरखपूर सोडणार का असा प्रश्न विचारला जात आहे मात्र मुख्यमंत्री झाल्यापासून योगी आदित्यनाथ यांनी किमान ३० वेळा दिलेली अयोध्या भेट बरेच काही सांगून जात असल्याचे जाणकार सांगतात.