मुंबई रेल्वेस्टेशनवर लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांची पुन्हा गर्दी

महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरवात झाल्याची चर्चा सुरु झाली असताना आणि मुंबईत एका दिवसात २० हजाराहून अधिक केसेस आल्याचे पाहून परराज्यातून आलेले मजूर, कामगार घरी परतण्याच्या फिकिरीत पडले आहेत. कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकेल या शक्यतेने मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस वर बिहारी आणि उत्तरप्रदेशातील मजुरांची प्रचंड गर्दी उसळली असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या वेळचा लॉकडाऊनचा अनुभव आणि त्यावेळी झालेले हाल, अनेकांना गावाकडे मिळेल त्या मार्गाने किंवा पायी जाताना आलेले मृत्यू यामुळे परराज्यातील कामगार, मजूर भयंकर अवस्थ बनले आहेत. जवळ असलेले पैसे संपण्यापूर्वी गावी परतण्यास आणि आपल्या परिवारात जाण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. गुरुवारी रात्रीपासून या टर्मिनसवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश दिसत आहे. अनेक जण दुसऱ्या दिवशीच्या ट्रेनसाठी आजपासूनच स्टेशनवर हजर झाले आहेत.

अनेकांना तिकीट मिळालेले नाही तरी दंड भरून रेल्वेतून जाण्याचा त्यांचा निर्धार आहे. मांडव, गवंडी, डेकोरेशन, फिटर, विविध कामात लागणारे कारागीर असे सर्व प्रकारचे कामगार यात सामील असून जवळ असलेले सर्व सामानसुमान घेऊन ते रेल्वे स्टेशनवर हजर झाले आहेत. अनेकांची खाण्यापिण्याची सोय नाही तरीही गावी परतायचे या एकाच इच्छेने ते स्टेशनवर थांबले असल्याचे समजते. अनेकांना गेल्या वेळी ओढवलेल्या उपासमारीच्या आठवणींमुळे रडू आवरत नसल्याचेही काही जणांशी बोलताना अनुभवास येत आहे.