न्यूयॉर्कच्या मिस युनिव्हर्स अपार्टमेंट मध्ये दाखल झाली हरनाज संधू

भारताला २० वर्षानंतर पुन्हा विश्वसुंदरी खिताब मिळवून देणारी चंदिगढ रहिवासी  हरनाज एक वर्षासाठी न्यूयॉर्कच्या मिस युनिव्हर्स अपार्टमेंट मध्ये दाखल झाली आहे. मात्र करोना नियमाप्रमाणे ती सध्या क्वारंटाइन आहे. ४ जानेवारीला हरनाज या नव्या घरात आली असून तिने या लग्झुरीयस घराचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. अर्थात या घरात हरनाज एकटी रहाणार नाही तर तिला हे घर मिस युएस सोबत शेअर करावे लागणार आहे.

या घरात हरनाजला किराणा मालापासून कपड्यांपर्यंत कुठलाच खर्च करावा लागणार नाही. म्हणजे येथील सर्व सुखसोयी तिला मोफत मिळणार आहेत. कारण मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन हा सर्व खर्च करत असते. हरनाजच्या अगोदर या घरात राहिलेली मेक्सिकोची मिस युनिव्हर्स अँद्रीया हिने हरनाज साठी एक पत्र लिहिले आहे. त्यात अँड्रीया लिहिते,’नव्या मिस युनिव्हर्स चे या घरात स्वागत. मला माझा या घरातला पहिला दिवस आठवतो आहे. या क्रेझी, सुंदर शहरात राहायचा उत्साह वाटतोय पण आपल्या जिवलगांपासून दूर राहणे अवघड असते. तू तेथे एकटी नाहीस. येथे अद्भुत सपोर्ट सिस्टीम आहे. कधीही फोन कर.’

या अपार्टमेंट मधून बाहेरच्या सुंदर गगनचुंबी इमारतींचे दर्शन होते. विवियन टोरेस यांनी या घराचे डिझाईन केले आहे. माजी विश्वसुंदरींच्या फोटोनी एक खास भिंत सजवली गेली आहे. हरनाज पुढील एक वर्ष या घरात राहणार आहे.