आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांचे मोठे वक्तव्य


सोलापूर – आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही चारवेळा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याची आणि कारवाई मागे घेण्याबाबत संधी दिली. पण, कर्मचारी यानंतरही कामावर हजर न झाल्यामुळे आता या कामगारांवरील कारवाई मागे घेण्यात येणार नसल्याचे मत मंत्री अनिल परब यांनी सोलापुरात व्यक्त केलं आहे.

अनिल परब पुढे म्हणाले, आमच्याकडून आम्ही २ नाही, तर ४ पावले पुढे गेलो. एस. टी. कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी मी चारवेळा संधी दिली होती. याबाबतीत वेळोवेळी आवाहन करूनही एसटी कामगार कामावर परतले नव्हते. आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावे, त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार आहे. आता ज्या एसटी कामगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे, ती माघारी घेण्यात येणार नाही. सरकारने दिवाळीच्या अगोदरपासून आत्तापर्यंत ५० एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या आहेत. २८ युनियनच्या कृती समितीबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या. ते यानंतरही आंदोलन मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चालले असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका आहे, या हवेतील गोष्टी आहेत. जर त्यांच्या जीवाला धोका असेल, त्यांनी रितसर पोलीस संरक्षण मागावे. त्यांना शासन संरक्षण देईल. कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नसल्याचेही अनिल परब यांनी नमूद केले.