यापुढे व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये दिसणार मॅसेज पाठवण्याऱ्याचा डिपी


नवनव्या फिचर्सच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना सुविधा मिळत असतात. नोटिफिकेशनमध्ये आतापर्यंत मॅसेज पाठवण्याऱ्याचा प्रोफाईल फोटो दिसत नव्हता. आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही सिस्टमवर ही सुविधा नव्हती. पण आता नोटिफिकेशन पाठवण्याऱ्याचा मॅसेजसह प्रोफाईल फोटो दिसणार आहे. या वर्षी २०२२ मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने पहिला बदल केला आहे. फक्त आयओएस बीटा युजर्ससाठी हे फिचर सुरुवातीला उपलब्ध आहे.

व्हॉट्सअ‍ॅप २.२२.१.१ बीटा व्हर्जन आयओएस १५ चे युजर्स वापरत आहेत. या संबंधित स्क्रीनशॉट व्हॉट्सअ‍ॅप फिचर ट्रॅकर WABeta Info ने आपल्या ब्लॉगवर शेअर केला आहे. यात लिहिले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन पाठवण्याऱ्याचा मॅसेजसह प्रोफाइल फोटोही दिसेल. याचा अर्थ चॅट आणि ग्रुप चॅटमध्ये मॅसेज आल्यास आता पाठवण्याऱ्याचा प्रोफाईल फोटोही दिसेल. WABetaInfo ने पुढे म्हटले आहे की. हे फीचर ज्या युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप खात्यावर अद्याप उपलब्ध नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सध्या, व्हॉट्सअ‍ॅप हे फिचर अधिक खात्यांमध्ये सक्रिय करण्याचा विचार करत आहे. WABetaInfo ने पुढे सांगितले की, सध्या काही लोकांना त्यांच्या व्हॉट्सअॅप खात्यावरील विशिष्ट नोटिफिकेशनमध्ये प्रोफाइल फोटो दिसत नाही. हे एक बीटा फिचर असल्यामुळे, आम्ही लवकरच या सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

दुसरीकडे, आपल्या यूजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. यामुळे युजर्संना त्यांच्या जवळील व्यवसाय सहजपणे शोधण्यात मदत होणार आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या फिचर्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo या प्लॅटफॉर्मच्या अहवालात म्हटले आहे की, “Businesses Nearby” नावाचा नवीन सेक्शन व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळू शकतो. युजर्स या सेक्शनमध्ये रेस्टॉरंट्स, स्टोअर्स, किराणा दुकाने आणि इतर ठिकाणे पाहू शकतील. पण व्हॉट्सअ‍ॅपवरून थेट ऑर्डर करू शकतील का? याबाबत स्पष्टता नाही. सध्यातरी संपर्क, स्थान अशी माहिती पाहू शकतील. हे फीचर अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये दिसले आहे, आयफोनमध्येही लवकरच येण्याची शक्यता आहे. सध्या या फिचरवर काम सुरू आहे. अद्याप कोणतीही तारीख रोलआउटसाठी निश्चित केलेली नाही.