राकेश झुनझुनवालांचे नवे १४ मजली घर अँटिलियालाही देईल टक्कर


मुंबई – गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला लवकरच कुटुंबियांसोबत एका नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. ते आता मुंबईतील एका पॉश भागामध्ये १४ मजल्यांच्या आलिशान बिल्डींगमध्ये राहणार आहेत. सध्या ते दोन मजल्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. ते लवकरच मलबार हिल्स परिसरातील घरात शिफ्ट होणार आहे.

याबाबत टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलबार परिसरातील बीजी खेर मार्ग येथील राकेश झुनझुनवाला यांच्या १४ मजल्याच्या घराचे काम सुरु आहे. पहिले येथे १४ फ्लॅट होते, जे राकेश आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ३७१ कोटी रुपयांना खरेदी केले होते. हे फ्लॅट तोडून आता तेथे बंगला बांधण्याचे काम जोरात सुरु आहे. जवळपास हा २७०० स्क्वेअर फूटचा प्लॉट असून ५७ मीटर उंच बिल्डिंग असणार आहे.

दरम्यान या १४ मजल्यांच्या बिल्डिंगमध्ये १२ व्या मजला हा मास्टर फ्लोअर असणार आहे. येथे राकेश आणि त्यांची पत्नी राहणार आहे. या फ्लोअरवर एक मास्टर बेडरुम, ड्रेसिंग रुम आणि एक लिविंग रुम असणार आहे. त्यांची मुले ११व्या मजल्यावर राहणार आहेत. मुलांसाठी दोन बेडरुम असणार आहेत. तसेच या मजल्यावर एक टेरेस असणार आहे.

चौथा मजला पाहुण्यांसाठी ठेवण्यात येणार आहे. किचन हे एल शेपमध्ये असणार आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर काही खोल्या, बाथरुम आणि स्टोरेज रुम असणार आहेत. तसेच ग्राऊंट फ्लोअरवर एक फूटबॉल कोर्ट तयार करण्याची योजना आखली जात आहे. झुनझुनवाला यांच्या या नव्या घरात एका मजल्यावर बॅंक्वेट हॉल, एक स्विमिंग पूल, एक जीम, होम थिएटर अशा अनेक गोष्टी असणार आहेत.