राजेश टोपे यांचा इशारा, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास होणार फौजदारी कारवाई


मुंबई – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे राज्याची वाटचाल सुरु असून, यादरम्यान नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचबरोबर पोलीस आणि प्रशासनाला गर्दी टाळण्यासाठी प्रसंगी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांमध्ये राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. 36,265 कोरोनाबाधितांची नोंद गुरुवारी राज्यात करण्यात आली. मुंबईत मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त व्यक्त केली जात असल्यामुळे निर्बंधही वाढण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, अनावश्यक गोष्टीमुळे प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात आल्यास पुढील काही कालावधीमध्ये निर्बंध वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो, याबाबत मुख्यमंत्री घोषणा करू शकतात.

राजेश टोपे यांनी सांगितले की, रुग्णालयात भरती होण्याचे तसेच ऑक्सिजन वापराचे प्रमाण वाढले नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या महासाथीपासून लस वाचवू शकेल. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पुणे, मुंबई तसेच ठाणेमधील पॉझिटिव्हीटी रेट तसेच ओमिक्रॉनचा वेग पाहता तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तर, इतर जिल्ह्यात अशी परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी शाळा बंद करण्याचा लगेचच निर्णय होणार नसल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.