प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला 80 टक्के लसीकरण करा आणि मग निवडणुका घेण्याचा सल्ला


नवी दिल्ली – 5 राज्यांमध्ये आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकांबाबत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निवडणूक आयोगाला एक सल्ला दिला आहे. निवडणुका ज्या राज्यांमध्ये होणार आहेत, त्या राज्यांमधील लसीकरण वाढवण्याची मागणी प्रशांत किशोर यांनी केली आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यामंध्ये 80 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. कमीत कमी 80 टक्के लोकांनी लसीचे 2 डोस घेतले पाहिजेत, असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

देशात सध्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. 2024 च्या निवडणुकांची तयारी प्रशांत किशोर हे करत असल्याची चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्यासाठी, ते सध्या रणनीतीकार म्हणून काम करत असल्याचे बोलले जात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये काँग्रसचे अनेक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. यावरुन प्रशांत किशोर यांच्यावर आरोप देखील केले जात आहेत. कारण, ज्या नेत्यांनी काँग्रेस सोडली, ते नेते सतत प्रशांत किशोर यांच्या संपर्कात होते.

दरम्यान, नुकतीच निवडणुक आयोगाची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली होती. मुख्य निवडणुक आयुक्तांबरोबर अन्य महत्त्वाचे अधिकारी यामध्ये उपस्थित होते. या बैठकीमध्ये वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि होणाऱ्या निवडणुका यावर चर्चा झाली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमावलीमध्ये थोडा बदल करण्याचा आयोगाचा विचार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाची आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या संदर्भातील नियमावली जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, निवडणुक आयोगाने यापूर्वी निती आयोग आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर देखील एक बैठक केली होती. या बैठकीमध्ये निवडणुकांच्या प्रचारात निघणाऱ्या रॅलींमध्ये होणाऱ्या गर्दीवर चर्चा करण्यात आली होती. अद्याप निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित केलेल्या नाहीत. पण, कोरोनाच्या संकटामुळे प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलींवर बंधने आणली जाऊ शकतात.

दरम्यान, गुरूवारी या 5 राज्यांमधील कोरोनाच्या स्थितीचा निवडणूक आयोगाने आढावा घेतला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि अन्य आरोग्य क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने गृह सचिव अजय भल्ला यांच्याबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील 17 व्या विधानसभेचा कालावधी हा 15 मे पर्यंत आहेत. मागच्या वर्षाचा विचार केला, तर यावेळी उत्तर प्रदेसमध्ये 8 टप्प्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये 3 टप्प्यात तर उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.