गोवा सरकारने घेतला माजी मुख्यमंत्र्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय!


पणजी – लवकरच गोव्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधात असलेल्या काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची राळ अनुभवण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. पण, या राजकीय कलगीतुऱ्याऐवजी गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सौहार्दाचे वातावरण दिसू लागले आहे. गोव्यातील सत्ताधारी भाजपचा एक निर्णय याला निमित्त ठरला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये गोवा सरकारच्या या निर्णयावरून दोन्ही पक्षांमधील तणावपूर्ण वातावरण काहीसे निवळण्याची शक्यता आहे.

नुकतीच गोवा विधानसभेत गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानसभेतील ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी आमदार म्हणून कारकिर्दीची ५० वर्ष पूर्ण केली. ८७ वर्षीय प्रतापसिंह राणे यांच्या या प्रदीर्घ अनुभवाची आणि कामगरीची परतफेड म्हणून गोवा कॅबिनेटने त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गोव्याच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवर दिली आहे.


आमच्या सरकारने असा निर्णय घेतला आहे की विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा दिला जावा. त्यांनी राज्याच्या केलेल्या सेवेची ही पोचपावती ठरावी. गोव्याचे मुख्यमंत्री हे राज्यातील सर्वोच्च पद आणि गोवा विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. ते कायमच गोव्याच्या लोकांसाठी प्रेरणा ठरतील. गोव्यातील लोकांच्या हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही काम करत असताना त्यांचे मार्गदर्शन मिळत राहील, अशी अपेक्षा ठेवतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, गोवा विधानसभेत ५० वर्षे आमदारकीचा काळ पूर्ण करणाऱ्या आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या किंवा विधानसभेचे अध्यक्षपद भूषवलेल्या सदस्यांना अशा प्रकारे आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला जाईल, असे या निर्णयानुसार ठरवण्यात आले आहे.