ओमिक्रॉनला सौम्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका; WHO च्या प्रमुखांचा इशारा


वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने भीतीचे सावट निर्माण केले असताना डेल्टाच्या तुलनेत तो कमी धोकादायक असल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी मात्र ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जगभरात मृत्यू होत असताना सौम्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका, असा इशारा दिला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने संसर्ग फैलावत असून मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचे ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले आहे. ओमिक्रॉनने अनेक देशांमध्ये डेल्टालाही मागे टाकले आहे, याचा अर्थ रुग्णालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत आणि खासकरुन लसीकरण झालेल्यांमध्ये कमी गंभीर असल्याचे दिसून येत आहे, पण याचा अर्थ त्याला सौम्य म्हणून दुर्लक्षित करावे असा होत नसल्याचेही ट्रेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मागील अनेक व्हेरिएंटप्रमाणे ओमिक्रॉनबाधित लोकांना देखील रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत असून मृत्यूसाठी जबाबदार ठरत असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

विशेष म्हणजे कोरोनाची त्सुनामी एवढी मोठी आणि जलद आहे की जगभरातील आरोग्य यंत्रणांवरील बोझा वाढला असल्याचे ते म्हणाले आहेत. जगभरात गेल्या आठवड्याभरात ९० लाख ५ हजार रुग्ण आढळल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे आहे. ही वाढ तब्बल ७१ टक्क्यांची आहे. त्याचबरोबर श्रीमंत देशांकडून लसींचा जास्तीत जास्त साठा घेतला जात असल्याने टेड्रोस यांनी नाराजी जाहीर केली असून यामुळे इतर व्हेरिएंट निर्माण होण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार केले असल्याचे म्हणत टीका केली. यामुळे किमान २०२२ मध्ये तरी लसींचे योग्य वाटप व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.