राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणांना अमृता फडणवीसांची अब्रुनुकसानाची नोटीस


मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटला आहे. राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना अमृता फडणवीसांनी अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे. अमृता फडणवीसांचा ‘डॉन्सिंग डॉल’ असा विद्या चव्हाणांनी उल्लेख केला होता. अमृता फडणवीसांनी यावर आक्षेप घेत विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानाची नोटीस धाडली आहे.

विद्या चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पण, त्यांनी हा निषेध नोंदवताना त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढले होते. दरम्यान अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या, जी आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!