कर्मचाऱ्यांची पुन्हा वर्क फ्रॉम होमला पसंती

लोकल सर्व्हील कंपनीने केलेल्या एका सर्व्हेक्षणात देशात करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोनचा फैलाव वेगाने होऊ लागला असून ६७ टक्के कर्मचाऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ पुन्हा सुरु केले जावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. कार्यालयातील गर्दी आणि एअर व्हेंटीलेशन सुविधा पुरेशी नसल्याचे लक्षात घेऊन सरकार आणि खासगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुविधा सुरु करावी असे मत मांडले गेले आहे.

जे कर्मचारी डेस्क जॉब करतात त्यांना ही सुविधा तातडीने लागू करावी असे मत व्यक्त होत आहे. कोविड केसेस वाढू लागल्यावर सर्व राज्य सरकारांनी निम्म्या क्षमतेने काम सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. करोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे आणि त्यावर कसा प्रतिबंध लावता येईल यावर विचारविनिमय सुरु आहे. अनेक खासगी कंपन्या सुद्धा यावर विचार करत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. केंद्राने सुद्धा करोना नियमावली काटेखोर पाळली जावी असे निर्देश दिले आहेत.

लोकल सर्व्हीलचे संस्थापक सचिन तापडिया यांनी २८ हजार कर्मचाऱ्यांमध्ये हे सर्व्हेक्षण केले असून त्यात ६३ टक्के पुरुष आणि ३७ टक्के महिलांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सार्स कोव २ चे सूक्ष्म कण आउटडोर पेक्षा इनडोर एरियात वेगाने फैलावत असल्याचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे कार्यालातात गर्दी वाढली तर प्रसार वेगाने होण्याची भीती आहे.