अशी असते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप(एसपीजी) ची तयारी
पंतप्रधान मोदी यांच्या काफिल्याला पंजाब मध्ये एका फ्लायओव्हर पुलावर २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागली आणि आंदोलकांनी रस्ता न दिल्याने भटिंडा विमानतळावर परतावे लागल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण या वीस मिनटांच्या काळात काही विपरीत होऊ नये याची काळजी घेताना पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळनाऱ्या एसपीजी कमांडोंचा श्वास नक्कीच अटकला असणार. गृहमंत्रालयाने ही सुरक्षेतील त्रुटी असल्याचे जाहीर केले आहे. पण या काळात आंदोलनकर्त्यांच्या आडोशाने कुणी दहशतवाद्याने पंतप्रधानांना धोका केला असता अशी भीती वाटणाऱ्यानी तशी काळजी करण्याची गरज नाही कारण मोदींसोबत त्यांचे एसपीजी कमांडो आहेत असा दिलासा दिला गेला आहे.
हे तेच कमांडो आहेत जे सूटबूट, काळा चष्मा लावून मोदींना घेरून असतात. गरज पडल्यास ते त्यांच्याकडच्या अत्याधुनिक हत्यारांनी क्षणात शत्रूला यमसदनी धाडू शकतात. भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या या एसपीजी कमांडो कडे जगातील सर्वात उत्तम अत्याधुनिक शस्त्रे आहेत. या कमांडोकडे कम्युनिकेशन साठी ईअरप्लग, सूटच्या आत बुलेटप्रुफ जाकीट, टॅक्टीकल काळा चष्मा, बेल्जियम येथे बनलेल्या एफएन २००० अस़ॉल्ट रायफल, एफएन पी ९० सबमशीन गण, एफएन ५-७ हॅँडगन, याशिवाय ऑस्ट्रिया येथे बनलेली ग्लेक १७ आणि १९ हँडगन असतेच शिवाय कॉम्बॅट शूज, बुलेट प्रुफ नी पॅड कमांडो वापरतात.
एफएन २००० रायफलचा फायरिंग रेट मिनिटात ८५० राउंड, एफएन पी ९० सबमशीनगन चा फायरिंग रेट प्रतीमिनीट ९०० राउंड तर असॉल्ट रायफलचा रेट प्रतीमिनीट ८५० राउंड आहे. शिवाय या टीम जवळ फोल्ड होणारे बॅलिस्टीक शीट असते जे गोळीबार झालाच तर पंतप्रधानांना त्याच्या आडोशातून सुरक्षित ठिकाणी नेले जाते. एनएसजीचे चार विभाग आहेत. पहिला प्रत्यक्ष ग्राउंडवर सुरक्षा देणारे, दुसरा ट्रेनिंग विभाग, तिसरा इंटेलीजन्स टूर आणि चौथा प्रशासकीय विभाग.
१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर १९८५ मध्ये एसपीजीची स्थापना केली गेली. सध्या या विभागात ३ हजार जवान, अधिकारी आहेत. एसपीजीचे बजेट ६०० कोटींचे आहे. याचा अर्थ पंतप्रधानांच्या सुरक्षेवर रोज होणारा खर्च साधारण १.६२ कोटी आहे.