अशी असते पंतप्रधान सुरक्षा
पंजाब मधील गुरुदासपूर जवळील एका पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे अडकून पडल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीच्या चर्चेला सर्व माध्यमातून उधाण आले आहे. ही घटना म्हणजे सुरक्षेतील गंभीर चूक मानली जात आहे. पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था कशी असते या संदर्भात माहिती म्हणूनच आवश्यक आहे.
पंतप्रधान कुठेही दौऱ्यावर जाणार असतील तर केंद्रीय गृहमंत्रालय दौऱ्यापूर्वीच त्या त्या संबंधित राज्यांना ब्ल्यू बुकलेट पाठविते. त्यानुसार सुरक्षेची फुलप्रुफ व्यवस्था केली जात असते. दौऱ्यापूर्वी १५ दिवस अगोदर राज्य सरकार, संबंधित अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजी एकत्रित पणे सुरक्षा व्यवस्थेची आखणी करतात. स्थानिक प्रशासन प्रथम मार्ग, पर्यायी मार्ग ठरविते आणि एसपीजी त्याला अंतिम स्वरूप देते. पंतप्रधान ज्या मार्गावरून जाणार तेथे ७ तास अगोदर सुरक्षा रिहर्सल घेतली जाते. कधी कधी दोन तीन तास अगोदर सुद्धा मार्ग बदलला जातो.
पंतप्रधान ताफ्यापासून ५० ते १०० मीटर अंतरावर स्थानिक पोलीस, गुप्तचर असतात आणि प्रत्येक क्षणाची माहिती कंट्रोल रूमला देत असतात. एसपीजी त्वरित त्यानुसार निर्णय घेत असतात. ऐनवेळी मार्ग बदलण्याची वेळ आलीच तर पूर्वी जे पर्यायी मार्ग ठरविलेले असतात त्यातील एक निवडला जातो. ताफा कुठे पर्यंत पोहोचला याची माहिती वेळोवेळी कंट्रोल रूम कडे जात असते. सर्वात पुढे पायलट कार असते जी पुढचा रस्ता निर्धोक असल्याचे संदेश देते.
पंतप्रधानांच्या डावी उजवीकडे एसपीजीचा घेरा असतो आणि वाहनातील कमांडो अतिशय सतर्क असतात. ताफ्यात अनेक प्रकारची वाहने असतात. पायलट कार, टेक्निकल कार, व्हीव्हीआयपी कार, जॅमर वाहन, अँब्ल्यूलंस असा हा ताफा असतो. पंतप्रधान ताफ्यात किमान पाच वाहने असतात. पहिली पायलट, दुसरी एस्कॉर्ट, मग पंतप्रधान कार, पुन्हा एस्कॉर्ट आणि एक स्पेअर कार. एसपीजी नेहमीच पंतप्रधानांना आपल्या गरड्यात ठेवतात, आणीबाणी आल्यास त्याची योजना तयार असते. २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रिवेंद्रम येथे अशीच चूक झाली होती.