मुंबई महापालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयात कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई


मुंबई – मुंबईतील खासगी रुग्णालयात दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही भरती होण्यासाठी कोरोनाबाधितां मुंबई महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने तशा सूचना खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांना 80 टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सरकारने निर्देशित केलेले दर आकारणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.

मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यामुळे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी दुसऱ्या लाटेप्रमाणेच पालिकेच्या परवानगीशिवाय खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधिताला दाखल करू नका, अशा सक्त सूचना प्रशासनाने रुग्णालयांना दिल्या आहेत. यासाठी पालिकेने नुकतीच खासगी रुग्णालयांसाठी नियमावलीही जाहीर केली आहे. त्याचबरोबर बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवा, अशा सूचनाही पालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.