गृह विभागाचा मोठा निर्णय; आता पोलिसही करणार वर्क फ्रॉम होम


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट आता उग्र स्वरुप धारण करत असताना देखील धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत असल्यामुळे गृह विभागाने आता पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र पोलिसांनाही वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. अनेक पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतही काल दिवसभरात 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. गृह विभागाने या पार्श्वभूमीवर 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा आदेश दिला आहे. ही माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील कोरोनाचा वाढता धोका पाहता पोलिसांच्या संरक्षणासाठी 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आला आहे. त्यांनी कामावर न येता घरुनच काम करायचे आहे.