महिलेच्या केसात थुंकले जावेद हबीब; मुख्यमंत्र्यापर्यंत तक्रार गेल्यानंतर सुरु झाला तपास


मुजफ्फरनगर – सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका शोदरम्यान ते एका महिलेच्या केसांवर थुंकताना दिसत आहे. मुजफ्फरनगरमधील एका कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. हबीब यांनी ३ जानेवारीला एका शोमध्ये केसांची देखभाल आणि शॅम्पूचे महत्त्व सांगून पूजा गुप्ताच्या केसात थुंकले होते. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


महिलेच्या केसात थुंकल्यानंतर व्हिडिओमध्ये जावेद हबीब या थुंकीत जीव असल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. बागपतमधील बरौतची ही महिला रहिवासी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हबीब यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याचवेळी, महिलेचे म्हणणे आहे की, तीन दिवसांपूर्वी हॉटेल किंग व्हिला येथे एका वर्कशॉपमध्ये जावेद हबीब यांनी हे प्रात्यक्षिक दिले होते.

महिलेचे केस कोरडे असल्याचे म्हणत हबीब हे त्यावर थुंकले. माझ्या केसात थुंकून हबीब यांनी माझा जाहीर अपमान केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येदरम्यान, या कृत्याबद्दल लोक जावेद हबीब यांच्यावर टीका करत आहेत. बदौतमध्ये वंशिका ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या पूजा गुप्ता यांनी म्हटले की, माझ्या ब्युटी पार्लरमध्ये अमन सर आणि आणखी एक व्यक्ती आले होते. मला त्यांनी सांगितले की, मुझफ्फरनगरमध्ये ब्युटी पार्लर आणि मेकअपवर एक सेमिनार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अडीच हजार फी होती. कंपनीकडून ५० हजारांची भेट मिळेल आणि मला केमिकल मेकअप कसा करायचा हे शिकवले जाईल, असे सांगण्यात आले. याशिवाय जावेद हबीब यांना भेटण्याचीही संधी मिळणार असल्याचेही सांगितले.


जावेद हबीब सेमिनारदरम्यान माझ्या केसांवर दोनदा थुंकले. त्यांनी असे करून माझा अपमान केला आहे. माझी नऊ वर्षांची कारकीर्द संपली. वर्कशॉपमध्ये मी पुन्हा केस कापले नाहीत. माझ्या गल्लीतील न्हाव्याकडून माझे केस कापून घेईल. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. हबीब यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे महिलेने म्हटले आहे. त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी याबाबत सांगितले की, व्हिडिओशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.