आदर्श गाव योजनेत समाविष्ट गावामध्ये कृषी विभागाच्या योजना राबवा – कृषिमंत्री दादाजी भुसे


मुंबई : आदर्श गाव योजनेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कृषि योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रशासनाला दिली. आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरजकुमार, सहसचिव (जलसंधारण) सुभाष गावडे, संचालक (जलसंधारण) शिसोदे, अवर सचिव (मृद व जलसंधारण) शुभांगी पोटे, आदर्श गाव समितीचे कृषि उपसंचालक सुरेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

कृषिमंत्री भुसे म्हणाले, लोकसहभागातून ग्रामविकास ही आदर्श गाव निर्मितीची संकल्पना आहे. हिवरे बाजार सारख्या गावाने त्या माध्यमातून विकास साधला आहे. या योजनेत सहभागी इतर गावांमध्ये कृषि विषयक योजनांची सांगड घातली तर ग्रामविकासाला अधिक गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोपटराव पवार यांनी आदर्श गाव योजनेची अंमलबजावणी ही नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, श्रमदान या पंचसूत्रीनुसार करण्यात येत होती. त्यामध्ये आता लोटाबंदी (हागणदारीमुक्त गाव) आणि बोअरवेल बंदी यांचा समावेश करुन या सप्तसूत्रीनुसार निकष ठरवण्यात आल्याचे सांगितले.

या योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास, गाव विकास (बिगर गाभा कामे), कृषि विकास कामे, पर्यावरण संवर्धन, मत्ता नसलेल्यांसाठी उपजीविका उपक्रम, उत्पादनाची व स्वयंरोजगाराची साधने यांची निर्मिती, समूह संगठन, गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार व विविध क्षेत्रातील क्षमता विकास यामध्ये समन्वय आदी कामे करण्यात येत असल्याची माहिती पवार यांनी दिली.