भारतीय पुरातत्व विभागाने हाणून पाडला रायगडावरील ‘मदार मोर्चा’वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न


रायगड – भारतीय पुरातत्व विभागाने रायगड किल्ल्यावरील ‘मदार मोर्चा’ येथे चारद टाकून प्रार्थनास्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल भारतीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून नाराजी व्यक्त करत कारवाई मागणी केली होती. त्यांनी या पत्रामधून रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आक्षेप घेताना ते हटवण्यात यावे, असे म्हटल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आल्याची माहिती संभाजीराजेंनीच दिली आहे.

काही दिवसांपूर्वी “किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून यासंदर्भात निदर्शनास आणून दिले. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे असल्याचे संभाजीराजेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

तसेच किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा, असेही संभाजीराजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाचे अधीक्षक तसेच नवी दिल्लीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत. या पत्रानंतर तातडीने कारवाई करण्यात आली असून संभाजीराजेंनी ‘मदार मोर्चा’ येथील त्या जागेचे काही फोटो शेअर करत सांगितले आहे.

मदार मोर्चा येथील प्रकाराची दखल घेत आज सकाळीच पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती जी व मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून तात्काळ याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले. यास प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. तसेच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती संभाजीराजेंनी फोटो शेअर करत दिली आहे. संभाजीराजेंनी पत्र पाठवून पुढाकार घेतल्यानंतर या बेकायदेशीर बांधकाम हटवल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त करत संभाजीराजेंच्या कामाचे कौतुक केल्याचे कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे.