इटलीहून अमृतसर विमानळावर आलेले १२५ प्रवाशी कोरोनाबाधित


अमृतसर – ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात आज कोरोनाबाधितांचा मोठा स्फोट झाला आहे. देशात काल दिवसभरात देशात ९० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. हा आकडा मागील दिवसाच्या तुलनेत ५६ टक्क्यांहून अधिक आहे. यादरम्यान ओमिक्रॉनबाधितांचा आकडा २६०० च्या पुढे गेला आहे. देशात सक्रिय प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये एका विमानातील तब्बल १२५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

पंजाबच्या अमृतसह विमानतळावर एअर इंडियाच्या इटली-अमृतसर विमानातील १२५ प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असल्याची माहिती विमानतळ संचालक व्हीके सेठ यांनी दिली आहे. १७९ प्रवासी या विमानात होते, त्यापैकी १२५ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणासाठी पाठवले जाणार असल्याचे, राज्य आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे. इटलीमध्ये कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील येथे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह कशी आली? असा सवाल अनेक प्रवाशांनी केला आहे.