देशात ओमिक्रॉनचा पहिला बळी; ७२ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू


जयपूर – भारतात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे पहिला बळी गेला आहे. हा मृत्यू राजस्थानच्या जयपूरमध्ये झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिली. ओमिक्रॉन पॉझिटिव्ह मृत ७२ वर्षीय रुग्ण निघाला होता, त्यानंतर त्याची चाचणी निगेटिव्ह आली. परंतु स्वास्थासंबंधीत गुंतागुंतीमुळे तो रुग्णालयात दाखल होता. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की हा मृत्यू ओमिक्रॉनचाच मानला जाईल. कारण तो ओमिक्रॉनची लागण झाल्यापासून रुग्णालयात दाखल होता.

देशातील ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी सांगितले की, देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २,१३५ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५३ आणि दिल्लीत ४६४ रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनवरील २,१३५ रुग्णांपैकी ८२८ बरे झाले आहेत.